रत्ना

स्थलांतर करणं म्हणजे इतके दिवस जे समजत होते ते इतकं साधंसोपं नव्हतं. फक्त महाराष्ट्रापुरतीच माझी भ्रमंती सीमित होती. पण बंगळुरूला गेल्यावर कळालं, आपला प्रांत सोडून परक्या ठिकाणी किती अडचणी येतात ते. कर्नाटक राज्याच्या या राजधानीत त्यांच्या मातृभाषेत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मला तर कन्नड अजिबातच येत नव्हतं. सगळ्यात मोठा प्रश्न होता कामवाल्या बाईचा. कारण त्या लोकांना तर कन्नडशिवाय दुसरी भाषा येत नाही. माझ्याकडे काम करायला रत्ना यायला लागली. पहिल्यांदा हातवाऱ्यांनी केले जाणारे संभाषण हळूहळू शब्द त्यांची जागा घेऊ लागले होते. पुन्हा पुन्हा येणारे शब्द आणि संदर्भावरून मी अर्थ लावत होते. तिच्या-माझ्यात एक वेगळाच संवाद निर्माण झाला होता.

रत्ना काळीसावळी नीटस होती. अंगकाठी चवळीच्या शेंगेसारखी लवलवती होती. डोळे भेदरलेल्या कोकरासारखे. महिना- दीड महिना मी या समजुतीत होते की, तिचे लग्न व्हायचे असावे. पण एक दिवस दोन वर्षांच्या एका मुलाला कडेवर घेऊन ती आली, तेव्हा तिच्या संसाराची कथा कळली. आणि त्या कथेतली व्यथाही. सहा वर्र्षांत तीन मुलं झालेली रत्ना ‘नशीब अजमावण्यासाठी’ बंगळुरूला आली होती. बंगळुरूमध्ये तीही नवखी होती. मीही नवखी होते. पण तिचं नवखेपण म्हणजे एका छोटय़ा गावामधून बंगळुरूसारख्या महानगरीत आल्याचं बावरलेपण होतं. नव्या जगात प्रवेश करताना येणारं भिरभिरलेपण चेहऱ्यावर दिसत होतं. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं लग्न झालं. नवरा शेती करत होता, लग्न झाल्यावरसुद्धा भांगलणी, खुरपणी करायला शेतावर जाई. पण तिच्या लग्नानंतर दोन-तीन वर्षांनीच नवऱ्याच्या सावत्र भावाने सगळी शेती हडप केली आणि रत्ना, तिची सासू आणि नवरा यांना घराबाहेर काढलं. दोन पोरं, नवरा आणि सासू यांना घेऊन रत्ना बंगळुरूला आली. तिचा काका पोलिसात होता. तो नवऱ्याला काही काम देईल या आशेने ती आली खरी, पण घरी बसायची चटक लागलेला तिचा नवरा काही ना काही कारणं काढून घरीच बसायला लागला. पर्यायाने, रत्नाच्या नशिबी धुणीभांडी करणं आलं.

रत्नाचे भोग इथेच संपत नव्हते. नवऱ्याला जुगाराचे व्यसन लागले. राबून, कष्ट करून हाता-तोंडाची गाठ घालताना रत्नाची दमछाक व्हायची. तीन पोरं पदरात, सासूची दादागिरी, नवऱ्याची व्यसनाधीनता, खरंतर कंटाळून जायला हवं होतं रत्नानं. पण त्रासला होता तिचा नवरा. सारखा तिला धमकी द्यायचा मी जीव देतो म्हणून, एक दिवस कंटाळून रत्नानं त्याला निक्षून सांगितले, ‘जा जाऊन जीव दे, नुसता खायला काळ आणि भुईला भार, तू गेलास की मी सुटीन एकदाची.’ मध्येच एकदा दोन-तीन दिवस रत्नाचा पत्ताच नव्हता. तिसऱ्या दिवशी आली. डोळे सुजलेले, चेहरा ओढलेला. विचारायला गेले तर धो-धो रडायला लागली. तिच्या नवऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांची झंझट मागे लागली. काका पोलीस असल्याने निभावून गेलं.  असाच प्रयत्न पुन्हा दोन वेळा झाला. आता ती आयुष्याला कंटाळल्यासारखी झाली होती. रहाटगाडगं चालूच होतं. अचानक दोन-तीन दिवस रत्ना आलीच नाही.

एक दिवस, सकाळीच दारावरची बेल वाजली. समोर उभी होती अस्ताव्यस्त केस पिंजारलेली, चेहऱ्यावरची रया गेलेली, डोळे खोल गेलेली रत्ना. तीन दिवस ती कामाला नव्हती. तीन दिवसांत रत्नामध्ये इतका फरक! आज पुन्हा नवऱ्याशी वाजलं वाटतं. असं काहीबाही मनात येत असतानाच रत्नाचा घोगरट स्वर माझी तंद्री भंग करून गेला. तिचा चिरका आवाज आणखीनच बसला होता. ‘दुड्ड बेकम्मा. केलसक्के आमेले बरतीनी.’ म्हणजे हिला पैसे पाहिजे होते.  मी काही म्हणायच्या अगोदरच ती मला म्हणाली, बघताय नव्हे कपाळावरचं कुंकू गेलं माझ्या. अंगावर एकदम सर्रकन काटाच आला. काखोटीला झोपलेलं पोर, साडी कशीतरी खोचलेली. ब्लाऊज गळ्याची हाडं दाखवत खाली ओघळलेला. डोळे मात्र कोरडेठाक. दारातच जमिनीवर फतकल मारून रत्ना बसली. घरात यायला तयार नव्हती. डोळे जमिनीकडे लावून कसलीतरी वाट बघत असल्यासारखी बराच वेळ गप्प होती. मलाही काय बोलावं सुचत नव्हतं. रत्नानं तिची कहाणी सांगायला सुरुवात केली.

त्या दिवशी सकाळी सगळी कामं आवरून रत्ना घरी गेली. पोरांना जेवायला घातलं. स्वत: जेवली आणि नवऱ्याची वाट बघत बसली. नवरा आला तोच दारू पिऊन. दारू पिऊन आला की तो निपचित पडत असे. भांडणतंटा, शिव्या यापासून दूर. पण निराशेच्या गर्तेत खोल जायचा. त्या दिवशीही तसाच. त्यामुळे कोणताही किंतु रत्नाच्या मनात आला नाही. पाणी भरून तिनं चहा केला. स्वयंपाकाला लागणार इतक्यात चिकम्मा, तिची आत्या, काही काम आहे म्हणून बोलवायला आली. रत्ना हातातलं काम टाकून, धाकटय़ाला तसंच टाकून नवऱ्याला सांगून निघाली. लोळत पडलेला तिचा नवरा, डोळे टक्क उघडे होते. पण उठायला तयार नव्हता. रागारागातच, नवऱ्याला उठण्याविषयी सांगून ती बाहेर पडली. जेमतेम वीस-पंचवीस मिनिटांसाठी बाहेर गेलेली रत्ना. येऊन बघते तर दार आतून बंद. हाका मारल्या. आतून प्रतिसाद नाही. म्हणून दारावर धडका मारल्या. हूं का चूं नाही. चिकम्माला पुन्हा बोलावले. चिकम्मा, तिचा नवरा, सगळे आजुबाजूचे लोक धावून आले. पण.. दार मोडून आत शिरल्यावर पाहते तो काय! तुळईला रत्नाच्याच साडीचा दोर करून त्याने गळफास लावून घेतला होता..
* * *
तीन वर्षांनी पुन्हा बंगळुरूला जायचा योग आला. मैत्रिणीकडे रत्ना अचानकच भेटली. केसात फुलांचा गजरा. अंगाने थोडीशी भरलेली. चेहऱ्यावर टवटवी. रत्नाचं हे पालटलेलं रूप बघून आश्चर्य वाटलं. मोठं ठसठशीत कुंकू. रत्नाचं पुन्हा लग्न झालं होतं. तीन मुलांसकट तिला पत्करणारा या जगात आहे हे बघून सुखद आश्चर्य वाटलं. रत्नापेक्षा वयानं जास्त असलेला व्यंकप्पा, त्याची बायको गेली तरी लग्न करायला तयार नव्हता. गवंडी कामावर रोजंदारीवर होता. पण त्याला रत्नाची कणव आली. सहृदय, पुरोगामी व्यंकप्पाने रत्नाचा स्वीकार केला. दोघंही आपल्या तीन मुलांसह गुण्यागोविंदानं नांदताहेत. रत्नाही चार घरची धुणीभांडी करते. पण आता तिच्या कष्टांना समाधानाची झालर आहे. मुलांना शाळेतही घातलंय. उण्यापुऱ्या दहा वर्षांत रत्नाच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली. दु:खात सुख एवढंच की एवढय़ा मोठय़ा महापुरानंतर आता तिची जीवननौका मात्र संथ पाण्यातनं प्रवास करतेय.

-सविता नाबर

प्रसिद्धी- चतुरंग, लोकसत्ता.

शनिवार , २८ एप्रिल २०१२