ती आई होती म्हणुनी…

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

 
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
 

कवी: ग्रेस

कवी ग्रेस यांच्या कवितेतून व्यक्त झालेली ‘आई’  अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात.

तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली, असे ते मानतात…
And when my voice is silent in death,
my song will speak in your living heart
– Ravindranath Tagore
कवी ग्रेस यांच्या मृत्यूनंतर रवींद्रनाथांचे हे उद्धृत अधिकच खरे ठरते. मृत्यूमुळे त्यांचा स्वर शांत झाला असला, तरी त्यांच्या कवितांची गूढ आशयांची स्वरावली रसिकमनात स्पंदत राहिली आहे, राहणार आहे.

शब्दांच्या आशयाच्या, प्रतिमांच्या धुक्यासारख्या रचना करणाऱ्या या कवीच्या प्रतिभेचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; पण तो पूर्णत्वाला गेला असा दावा कोणीच करू शकलेले नाही. तरीही पुन्हा पुन्हा त्यांच्या कवितेच्या आशयाचा, रचनालयीचा, प्रतिमांचा उलगडा करून पाहावा असे मात्र सतत वाटत राहते. त्यांच्या कवितेची ही सारी अंगे, तिचे तरल पदर संपूर्णपणे न्याहाळणेही अवघड वाटावे. म्हणून येथे फक्त त्यांच्या कवितेतील ‘आई’ प्रतिमेच्या अर्थनिर्णयाचा प्रयत्न करून पाहायचे आहे.
ग्रेस यांच्या कविता, ललितलेखन यांचे वाचन केल्यानंतर काही गोष्टी ध्यानी येतात. त्यांच्या कलासृष्टीत त्यांचे स्वत:चे खास असे अनुभवविश्व साकार होत गेलेले आहे. कलावंताचे व्यक्तिमत्त्व, त्याचा प्रतिभाधर्म आणि त्याची अनुभव घेण्याची पद्धती यानुसार त्याच्या कलासृष्टीतील अनुभवविश्वाचे स्वरूप, शैली, प्रकृती व रचना हळूहळू निश्चित होत असतात. ग्रेस यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी एकच विषय आहे, असे दिसते. त्यांची प्रतिभा एकाच आशयाभोवती रुंजी घालते आणि त्या दृष्टीने पाहता, ग्रेस यांच्या कलासृष्टीचे अनुभवविश्व एककेंद्री आहे. मानवी जीवनातील अगम्य, अटळ असे दु:ख हे त्यांच्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच दु:ख त्यांच्या साहित्यसृष्टीचे शक्तिकेंद्र आहे. या शक्तिकेंद्रातून असंख्य अनुभवतरंग कलारूपे घेऊन अवतरत राहतात. कवितेत सृजन आणि मरण या दोन टोकांमधले जीवन कवीच्या प्रकृतीनुसार अभिव्यक्त होते. ग्रेस यांच्या कवितेच्या दु:खकळेची सूक्ष्मासूक्ष्म जन्मकारणे त्यांच्या कवितेतून स्पंदत असतात. सृजनशक्तीचे आणि मृत्युशक्तीचे एक केंद्र ‘स्त्री’ आहे. निर्मितीच्या क्षणीच निर्मितीनाशाच्या भयाने कंपित होणारी ग्रेसची जाणीव स्त्रीच्या अनेक प्रतिमांतून सतेज होत जाते. बाला, कुमारी, माता (मातास्वरूप इतर स्त्रिया- त्यांच्या प्रतिमा), या स्त्रीरूपांतून ही जाणीव रूपे धारण करते. सौंदर्य, मार्दव, कामभावना, करुणा, मनस्वीपणा, देहस्वीपणा या गुणांनी त्यांची ‘स्त्री’ नटलेली आहे.

परंतु त्या सर्व रूपांतही ‘आई’ व तिची गुणस्वरूपे तिच्या रूपाने वाटय़ाला आलेले जीवनाचे दु:खमय, करुणामय भागधेय हे ग्रेसच्या या प्रतिमेचे वैशिष्टय़ आहे. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ही ‘आई’ अगदी शुद्ध रूपातील एक ‘देहस्विनी’ आहे. त्यांच्या कवितेत ‘आई’ प्रतिमेचे, नात्यातून निर्माण होणारे भावनिक उदात्तीकरण नाही वा कठोर वास्तवातून आलेले अवमूल्यनही नाही. ‘आई’मधील ‘आदिम स्त्री’, तिचे वासनामय देहनिष्ठ स्वरूप ग्रेस नाकारत नाहीत. तिला ‘स्त्री’ म्हणून समजून घेतात. तिच्याचमुळे आपण अस्तित्वात आलो आणि तिच्याबरोबरच जन्मकाळाची गूढेही आपल्या वाटय़ाला आली. त्यात दु:खाचा, उदासीचा रंग अधिक ठळक आहे असे ते मानतात.
मातृवनात जगत असताना तिच्याही जगण्याच्या सावल्या आपल्या आयुष्यात सरमिसळ झाल्या आहेत, अशी भावना त्यांची कविता व्यक्त करते. आयुष्याच्या सांध्यपर्वात, शब्द हरवून गेल्यावर ती ‘सांजफुलांची वेळ’ होते, पाण्यावरच्या चंद्रखुणा (शृंगारसूचक)ची ती ‘निळीसावळी वेल’ होते, गात्रांचे शिल्प स्पर्शापासून सुटल्यावर ती ‘गतजन्मीची भूल’ होता होता अखेरीस पायात धुळीचे (पार्थिवतेचे) लोळ घेऊन ‘भातुकलीचा खेळ’च होऊन जाते.

‘आई’च्या या देहस्विनी रूपामुळे पुढे तिनेच दिलेल्या आयुष्यावर ‘चंद्राची राख’ पसरली, हे आपले प्रारब्ध मानून कवी तिला परोपरीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

‘चोरून अमेच्या रात्री
देऊळात आई गेली
अन् बालपणावर माझ्या
चंद्राची राख पसरली..
गावात पोचलो तेव्हा
मज उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्यासी निजला होता..
‘गावातल्या आठवणी’ या कवितेतून आपल्या वृत्तीतल्या वैरागीपणाचे रहस्य जणू आईच्या वर्तनातून उमटत जाते असेही कवी सुचवितो. शिवाय, मी तुझ्यापोटी आलो म्हणून तू आई होऊ शकलीस. पण मुलगा म्हणून संशयधुक्याच्या वेदनेपेक्षा नि:संग विरक्तीच का दिली नाहीस असाही प्रश्न कवी विचारतो. या वृत्तीतूनच ग्रेसच्या कवितेतील प्रतिमा, आशय यांचे अपारंपरिक रूप दिसून येते.
‘आडवाच झोपलो असतो
मीही गर्भाशयात तर
येऊ दिले असते का
तुझ्या वाटय़ाला माऊलीचे भाग्यपण?’
तेव्हाच शिवून दिली असतीस
भगव्या क्षितिजाची झोळी
तर काय झाले असते?

आईचे चोरून देवळात जाणे- तिथे कुणा संन्याशाचे असणे, याचा एक दीर्घकालीन परिणाम ‘चंद्राच्या राखे’च्या प्रतिमेतून सुचविला जातो. कवीच्या कवितेतून सतत ही संन्यस्त, बैरागी वृत्ती वावरत राहते.
‘आई’च्या देहस्विनी असण्याला कवी याच संन्यस्त वृत्तीने, आयुष्य खूप कळून आल्यानंतरच्या शहाणपणाने स्वीकारतो. आणि या ‘स्त्री’ केंद्रातूनच कवीच्या अनुभवाची कलारूपे साकारतात. ‘माझी आई : सुमित्रा’ या कवितेत कवी लिहितो,

‘परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून
ती केव्हाच निघाली बेभान :
प्रियकरांचे, यारांचे निर्घृण वध, तर डोळी त्यांचेच
धगधगते बेमुर्वत इमान!
संध्या मलुल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने वाकलेली :
तुटलेली कर्णव्याकूळ करंगुळी..
देवासारखे हसता येईल मला : मला संतासारखे रडता
येईल? तिच्या कपाळी, चंद्रमौळी..’
‘आई’ हे ग्रेसच्या कवितेचे एक प्रबळ शक्तिकेंद्र आहे. कवी तिच्याकडे तिच्यातील ‘मादी’पणाकडे पाहतो. तिचे प्रमत्तपणच आपल्याला भुलवते, जगवते, प्रेरणा देते. कवी म्हणतो,

‘माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल..
माझी आई भिरभिर संध्या
घेई सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा..

आईमुळेच निर्मितीशीलतेचा अर्थ कळतो. आईमुळेच ‘शिंदळ वारा’सुद्धा शालीन होतो. अशा आईच्या जाण्यानंतर कवी ‘घनव्याकूळ’ रडतो. तिच्या जाण्याबरोबर आपले बालपणही संपले. जीवनगीताच्या ओळी तुटक, अधुऱ्याच राहिल्या ही जाणीव ठसठसत राहते.

‘‘आता लिहिताना काही
जरा वेगळे वाटते
माझ्या लेखणीची ओळ
तिळातिळाने तुटते
शब्द अनाथ दिसती
रेष हळूच ओढावी-
टिंब ठेवूनही अंती
गीत अपुरे वाटते..’’

ग्रेसच्या या ‘आई’ प्रतिमांचा अर्थनिर्णय करताना प्रश्न पडतो की कवितेत कवी आपल्या अनुभूतींचा मागोवा कसा घेत असतो? प्रथम प्रत्यक्ष जीवनात अनुभव घेऊन नंतर त्या स्थूल अनुभवाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभूती कवितेत व्यक्त करतो का? कविता म्हणजे कवीने/ माणसाने भूतकाळात घेतलेल्या अनुभवाची प्रतिकृती किंवा स्मृतिकोषात तरळणारी प्रतिमा नसते. Poetic image is not an echo of the past! कवीची कल्पनाशक्तीच आपल्या प्रतिमा व्यापाराला वास्तव व भूत यापासून अलग राखत असते.

ग्रेसच्या कवितेतील ‘कवी/मी’ त्याच्या खास अनुभवमुशीतून ‘आई’च्या स्त्री-मादी-देहस्विनीरूपाची अनुभूती घेतो. ही अनुभूती तो स्वत:च्या शब्दतंद्रेतून, कल्पकतेने घेतो. म्हणून त्या अनुभूतीला नवेच कल्पकतापूर्ण अर्थरूप मिळू लागते. तेथे वास्तव ‘आई’ उरत नाही. तिच्या स्वभाव, वृत्ती, देहाचे हुबेहूब शब्दचित्र रेखाटणे यात काव्यात्मता नसते. कवीची भाषा वास्तवाला नवे अनुभूतीस्वरूप, आशयरूप देत असते. यालाच ग्रेस रूपकांची पांघरणी आणि पाझरणी म्हणतात. ग्रेसच्या कवितेत आणि एकूणच त्यांच्या भावविश्वात ‘आई’ किंवा ‘मातृवत’ हा अनुभवविषय असून अनुभव घेणारी कवीची संवेदनशीलता तिचा सर्जनशील कल्पकतेने अनुभव घेते.

‘आई’च्या देहस्विनी स्वरूपातील ‘मादी’ मागे एक कोसळणारे घर सावरणारी, मुलांना जोजवणारी, पाजणारी, पोसणारी ‘आई’सुद्धा आहे. ‘आई’च्या या थकल्या-भागल्या जीवाबद्दलची करुणा ग्रेसच्या कवितेत पुन्हा पुन्हा येत राहते.

‘घर थकलेले संन्यासी
हळुहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमध्ये
नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या-मधुरा,
रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी
आभाळ घसरले होते.
पक्ष्यांची घरटी होती
ते झाड तोडले कोणी?
एकेक ओंजळीमागे
असतेच झऱ्याचे पाणी.

या सुप्रसिद्ध कवितेत थकलेले घर सावरणारी, घसरणारे आभाळ तोलणारी, पक्ष्यांच्या वस्तीचे झाडच तोडून टाकल्यावर झऱ्याचे ओंजळभर पाणी होणारी आईच आहे. म्हणून तर तिच्या मृत्यूनंतर कवी ‘घनव्याकूळ रडतो’, आपल्या गीताची ओळ आता अपुरीच राहिली म्हणून खंतावतो, तर तिच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून तिचीच विनवणी करतो. आणि पिंड शिवणाऱ्या, पर्यायाने आईला मुक्ती देणाऱ्या कावळ्याला ‘सांध्यपर्वातील

वैष्णवी’ अर्पण करून टाकतो.
‘आई’च्या जीवनशैलीतील विसंगती, विरोध, अगतिकता यांचे
भान कवीला एक मुलगा, एक जाणता पुरुष, एक नैतिक-
अनैतिकाच्या पल्याड गेलेला संन्यस्त, संवेदनशील कवी या अनेक नात्यांनी येत जाते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते येते.
‘अंधार येतो तिच्या भोवताली
तिला वाटते चंद्र ती मोजते
निनादातला मृत्यू यावा गळ्याशी
उभ्याने तशी अस्त ती झेलते.’
आयुष्यात उभ्या उभ्या स्वत:चे असे अनंत अस्त झेलणारी आई-
‘गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी
आई उभ्या उभ्याने रचते अभंग कोटी’

जीवनाचे हे करुणरम्य कोटी कोटी अभंग रचताना, तिच्या आयुष्याचे चंद्रगंध विटून गेले, तरी ‘पाठीत वाकताना आई गळ्यात हसली.’ मुलांना उन्हाळेसुद्धा समना वाटून देणारी आई, तिला जगण्याच्या आरशातून (मृत्युरूप) घारी बोलावतात त्यांना आपला देहही वाटून देते. अशी ही ग्रेसच्या कवितेतली ‘आई’. ती बाई, ती पोर, ती वृद्धा, तीच सीता, ऊर्मिला, द्रौपदी. तीच मिसेस नॅली डीन, तीच मेरलीन मन्रो, तीच नटाली, तीच राधा पार्थसारथी, तीच हॉस्पिटलमधली केरळी नर्स, तीच चंद्रमाधवी, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांध्यभयाची सजणी! सर्व काही तीच. आदिम स्त्रीत्वरूप अशारीर स्त्री, हाडामांसाची शारीर स्त्री!

आई प्रतिमेचा अशा प्रकारे अनुभव घेणारी ग्रेसची संवेदनशीलता कधी रामायण-महाभारतातील सीता-मिथिला, (लक्ष्मण)- शूर्पणखा यांच्यासारख्या मिथकांतून दु:ख, वेदना, वंचना यांचे रूपही अनुभवते-
‘कधी हिडिंबा पारोशी
शूर्पणखाही उदास;
देहभावाला झोंबते
देहभावाची किळस!
कधी राधा कधी कुब्जा
देहाखालून चालते;
शूर्पणखेच्याही पोटी
नवे लक्ष्मणाचे नाते.

किंवा कृष्णाने भामा, द्रौपदी, राधा यांना दिलेल्या वेदनांचेही रूप कवी मातृप्रतिमेच्या पडछायेप्रमाणे अनुभवतो. मातृरूपातून घेतलेला हा स्त्रीत्वाचा शोध ग्रेसच्या कवितेतील धमनी आहे. अनुभवविश्वातील शक्तिकेंद्राचे स्थान गवसले आणि त्यांच्या संवेदनशीलतेचा धर्म उलगडला की, ग्रेसच्या ‘आई’ कविता दुबरेध राहत नाहीत. तसेच त्यांचा इतर प्रतिमांच्या संघाताशी अनुबंध जोडता येतो आणि ‘मातृरूप’ ‘स्त्री’ प्रतिमेतून प्राक्तन म्हणून मिळालेल्या निर्मितीशक्तीचा, निर्मितीऱ्हासाच्या भयाचा वेदनेचा उदास रंग समजू लागतो आणि कवी-

‘ही माझी प्रीत निराळी
संध्येचे श्यामल पाणी,
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी.’
असे का म्हणतो, यातला ‘डोह’ कोणता हे सहज उमगू लागते. कवितावाचनाच्या रूढ वाटा सोडल्यानंतरच ग्रेसच्या प्रतिमा समजल्यासारख्या वाटतात. एका कवितेतून एक सलग उलगडत जाणारे आशयसूत्र सापडले की कविता ‘समजली’ असे मानणारी वाट सोडली तरच ग्रेसच्या कवितेतील भाववृत्तींचे संरचित दिसू लागते.
कविता हा जर कवीची शब्दतंद्रा आणि रसिकाची शब्दतंद्रा यातील ‘भावविण्याचा करार’ असेल, तर ग्रेसची कविता हा करार पाळते असे म्हणता येईल. आणि मग कवीच्या अनुभवविश्वातील देहरूप, वासनारूप ‘मातृकेंद्र’ कवितेतून ‘शोकमग्न गीतांच्या ओळी’ लिहायला कसे उद्युक्त करते त्याचा थोडा थोडा तळ न्याहाळता येतो. म्हणूनच हे अर्थनिर्णयनाच्या तीरावरून दिसलेले ‘आई’चे रूप!

‘आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरज वेळी वाटत फिरतो
जोगी कुठले वेध?..
..त्याही नंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर..’

दिसले, समजले असे वाटावे आणि पुढच्याच प्रतिमेने आणखी तरंग उठवावेत आणि तरीही उत्कट, उदासीच्या लयीने ‘आई’ आपल्या मनाच्या नदीमध्ये नाद उमटवत निघून जावी, म्हणून हा अर्थनिर्णयनाचा तीर!

डॉ. ज्योतिका ओझरकर

प्रसिद्धी- चतुरंग, लोकसत्ता, शनिवार, ७ एप्रिल २०१२